मनसेच्या भूमिकेवर सस्पेन्स एकनाथ शिंदेंच्या एका वाक्यात संकेत
महाराष्ट्र
January 24, 2026
मुंबई महापालिका २०२६
- मुंबई महापालिका निवडणूक २०२६ चे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेचे राजकारण चांगलेच तापले आहे. २२७ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेला ११४ चा आकडा एकाही पक्षाला पार करता आलेला नाही. भाजपला ८९ जागा मिळाल्या असून, शिवसेना शिंदे गटाचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला ६५ जागा, तर मनसेला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
- या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट मिळून ११८ नगरसेवकांचा आकडा होत असल्याने भाजप शिंदेंना सोबत घेऊन मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र यामध्ये मनसेची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- कल्याण-डोंबिवली महापालिकेत उद्धव ठाकरे गटापासून फारकत घेत मनसेचे नगरसेवक शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे मुंबईतही मनसे तोच कित्ता गिरवणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच “राजकारणात काहीही होऊ शकतं” असे सूचक विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.
- दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत मनसेचा पाठिंबा घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, “जर-तरवर बोलण्यापेक्षा आता जे वास्तव आहे, त्यावर बोला,” असे उत्तर शिंदेंनी दिले. तसेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार, असा ठाम दावा देखील त्यांनी केला आहे.
- एकीकडे भाजप-शिंदे युती बहुमताच्या जवळ पोहोचली असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेची पुढील चाल काय असेल, यावर मुंबईतील सत्तासमीकरण अवलंबून राहणार आहे. युतीचे राजकारण होणार की एखादी नवी राजकीय खेळी पाहायला मिळणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
Tags: News
← पक्ष सोडून आरोप करणाऱ्यांना मनसेचे सडेतोड उत्तर
बारामतीत विमान अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन →