चेस मास्टर’ विराट कोहलीची विक्रमी सेंच्युरी
क्रीडा
January 29, 2026
चेस मास्टर’ विराट कोहलीची विक्रमी सेंच्युरी; सेहवाग आणि पाँटिंगचा मोठा विक्रम मोडला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आपली ‘चेस मास्टर’ ही ओळख सार्थ ठरवली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर ३३८ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने एकाकी झुंज दिली आणि शानदार शतक झळकावले.
या सामन्यात विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील ५४ वे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८५ वे शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांचा मोठा विक्रम मोडीत काढला.
इंदूरमध्ये संपला दुष्काळ
इंदूरच्या मैदानावर यापूर्वी विराट कोहलीने ४ वनडे सामने खेळले होते. मात्र, एकाही सामन्यात त्याला अर्धशतकही करता आले नव्हते. तिसऱ्या वनडेत त्याने आधी हा दुष्काळ संपवला आणि त्यानंतर नव्या वर्षातील तसेच न्यूझीलंडविरुद्धचे खास विक्रमी शतक साकारले.
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या एका डावात त्याने सेहवाग आणि पाँटिंग यांना ‘धोबीपछाड’ दिली. सेहवाग आणि पाँटिंग यांनी न्यूझीलंडविरुद्ध वनडेत प्रत्येकी ६-६ शतके झळकावली होती, तर विराटने हा टप्पा ओलांडत नवा विक्रम प्रस्थापित केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणखी एक ऐतिहासिक कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीचे हे १० वे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू जॅक कॅलिस यालाही मागे टाकले. कॅलिसने न्यूझीलंडविरुद्ध ७६ डावांत ९ शतके झळकावली होती. याशिवाय जो रूटने ७१ डावांत ९, तर सचिन तेंडुलकरने ८० डावांत ९ शतके करण्याचा विक्रम केला होता.
या तिन्ही दिग्गजांना मागे टाकत विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. विराटची ही खेळी केवळ एका सामन्यातील शतक न राहता, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान ठरली आहे.